धाराशिव (उस्मानाबाद):
Pik Vima 2025 : राज्य शासनाने एक रुपयात असणारी पीक विमा योजना रद्द करून शेतकऱ्यांवर अतिरिक्त बोजा टाकला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा पिक विमा योजनेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. परिणामी, 2025 मध्ये जिल्ह्यात केवळ 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांनी, 4 लाख 93 हजार अर्जद्वारे शेतकऱ्यांनी पिक विमा घेतला, तर गेल्या वर्षी ही संख्या तब्बल 7 लाख 19 हजार 853 होती.
शेतकऱ्यांवरील अतिरिक्त भार
मागील वर्षी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून 597 कोटींचा प्रीमियम विमा कंपनीकडे गेला होता. मात्र नुकसान भरपाई म्हणून केवळ 273 कोटी रुपये मिळाले.

यंदा शेतकऱ्यांचा वाटा 44 कोटी, राज्य शासनाचा 43 कोटी, आणि केंद्र शासनाचा 43 कोटी असा एकूण 130 कोटी 77 लाखांचा हप्ता विमा कंपनीकडे जमा झाला आहे. पण प्रत्यक्ष नुकसान भरपाई किती मिळणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये संशय कायम आहे.
तालुका-निहाय पिक विमा अर्जांची संख्या (2025)
तालुका | शेतकरी संख्या | अर्ज संख्या |
भूम | 24,321 | 61,680 |
धाराशिव | 56,905 | 88,708 |
कळम | 42,317 | 78,661 |
लोहारा | 19,569 | 3,329 |
परंडा | 16,385 | 42,015 |
तुळजापूर | 50,899 | 78,994 |
उमरगा | 33,923 | 57,332 |
वाशी | 21,774 | 53,236 |
शेतकरी नेत्याची प्रतिक्रिया
शेतकरी नेते अनिल दादा जगताप यांनी सरकारवर तीव्र टीका केली. ते म्हणाले –
“राज्य शासनाने पिक विम्यातील भ्रष्टाचाराचे कारण पुढे करत एक रुपयातील योजना बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांवर 450 कोटींपेक्षा अधिक बोजा पडला. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर एकट्याचा 44 कोटींचा भार पडला आहे. तसेच चार पैकी तीन ट्रिगर बंद केल्यामुळे नुकसान भरपाई अपुरी मिळते. हे धोरण पूर्णपणे शेतकरी विरोधी आहे.”
पिक विमा सहभाग निम्म्याने घटला.
- धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांचा पिक विमा सहभाग निम्म्याने घटला.
- विमा कंपनीकडे मोठ्या प्रमाणात प्रीमियम गेला, पण नुकसान भरपाई अपुरीच मिळाली.
- शेतकरी नेत्यांच्या मते, शासनाने योजनेत बदल करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.