धाराशिव : Dharashiv farmers relief | राज्य शासनाने आतापर्यंत जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या तीन शासन निर्णयातून धाराशिव जिल्ह्याला 522 कोटी 58 लाखाची मदत जाहीर. अनुदान वितरणाची गती वाढविण्याची गरज
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा बसला असून मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले असून, जमिनी खरवडून गेल्या आहेत, घरांची पडझड झाली असून, पशुधन ही वाहून गेले आहे. रस्ते व पूल यांचे दुर्दशा झाली असून महावितरणचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राज्य शासनाने या बाबीचा विचार करून ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाकडे गेल्यानंतर 23 सप्टेंबर च्या शासन निर्णयात धाराशिव जिल्ह्यातील 2लाख 34 हजार 955 शेतकऱ्यांना 189 कोटी 60 लाख 67 हजार रुपये जाहीर केले होते. त्यानंतर राज्य शासनाने 16 ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय काढला त्यात धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 656 शेतकऱ्यांना 292 कोटी 49 लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. 17 ऑक्टोबर रोजी ज्यांच्या शेतजमिनीचे नुकसान झाले आहे जमिनी खरडून गेले आहेत अशा धाराशिव जिल्ह्यातील 33263 शेतकऱ्यांना 40 कोटी 48 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
याचा अर्थ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीतून दिलासा मिळावा यासाठी आत्तापर्यंत काढलेल्या तीन शासन निर्णयातून 6 लाख 39 हजार 611 शेतकऱ्यांना 522 कोटी 58 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे. मात्र अनुदान वितरण करण्याची गती खूप कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीचा सण साजरा करताना, आर्थिक गणित जमवताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे ज्या गतीने राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर केले त्याच गतीने आता मदत देण्याची देखील आवश्यकता आहे.
16 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयाद्वारे धाराशिव जिल्ह्यातील चार लाख 4656 शेतकऱ्यांना जी 292 कोटी 49 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे त्याची तालुका वाईज माहिती पुढील प्रमाणे आहे.
| क्रमांक | तालुका | शेतकरी संख्य | मदतीची रक्कम (रु.) |
| 1 | धाराशिव | 41,574 | ₹40 कोटी 51 लाख |
| 2 | तुळजापूर | 73,311 | ₹67 कोटी 60 लाख |
| 3 | उमरगा | 68,331 | ₹61 कोटी 45 लाख |
| 4 | लोहारा | 10,350 | ₹10 कोटी 60 लाख |
| 5 | भूम | 49,250 | ₹23 कोटी 11 लाख |
| 6 | परंडा | 73,117 | ₹70 कोटी 57 लाख |
| 7 | कळम | 55,287 | ₹11 कोटी 89 लाख |
| 8 | वाशी | 33,436 | ₹8 कोटी 12 लाख |
| एकूण | धाराशिव जिल्हा | 4,04,656 | ₹292 कोटी 49 लाख |
1️⃣ धाराशिव तालुक्यातील 41,574 शेतकऱ्यांना 40 कोटी 51 लाख मिळणार आहे.
2️⃣ तुळजापूर तालुक्यातील 73 हजार 311 शेतकऱ्यांना 67 कोटी 60 लाख रुपये मिळणार आहे
3️⃣ उमरगा तालुक्यातील ६८३३१ शेतकऱ्यांना 61 कोटी 45 लाख रुपये मिळणार आहेत
4️⃣ लोहारा तालुक्यातील दहा हजार 350 शेतकऱ्यांना दहा कोटी साठ लाख रुपये मिळणार आहेत
5️⃣ भूम तालुक्यातील 49,250 शेतकऱ्यांना 23 कोटी 11 लाख रुपये मिळणार आहे.
6️⃣ परंडा तालुक्यातील 73,117 शेतकऱ्यांना 70 कोटी 57 लाख रुपये मिळणार आहे.
7️⃣ कळम तालुक्यातील 55,287 शेतकऱ्यांना 11 कोटी 89 हजार रुपये मिळणार आहेत
8️⃣ वाशी तालुक्यातील 33436 शेतकऱ्यांना आठ कोटी बारा लाख रुपये मिळणार आहेत.
राज्य शासनाने जाहीर केलेली ही मदत केवळ दोन हेक्टर च्या मर्यादित आहे आणखी एक हेक्टर चे 8500 तसेच रब्बी हंगामासाठी जाहीर केलेले प्रती हेक्टर 10 हजार रुपये याप्रमाणे मिळणाऱ्या मदतीचा प्रस्ताव देखील राज्य शासनाकडे लवकरच जाणार असून ती मदत देखील शासन निर्णयानंतर शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येणार आहे.
राज्य शासनाने अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, तीन शासन निर्णयातून आतापर्यंत 522 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे. जाहीर केलेली मदत शेतकऱ्याच्या खात्यावर लवकरात लवकर कशी वर्ग होईल हे पाहणे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आहे.

जरी ॲग्री स्टिक द्वारे ही मदत पडणार असली तरी ॲग्री स्टिक न झालेल्या 20% शेतकऱ्यांना केवायसीद्वारेच ही मदत पडणार आहे एक ऑक्टोबर पासून बंद असलेले केवायसी पोर्टल राज्य शासनाने तातडीने चालू करण्याची गरज आहे.अशी मागणी शेतकरी नेते अनिल जगताप यांनी केली





