धाराशिव : Makni Dam Height Protest |
अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखालील माकणी धरण उंचीवाढ विरोधी जनआंदोलनाला आमदार प्रवीण स्वामींचा पाठिंबा
अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणीवर
बेलकुंड उपसा सिंचन योजनेसाठी माकणी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचालींना वेग आला असून, राज्य जलसंपदा विभागाने २२ ऑगस्ट २०२५ रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकातील अट क्रमांक ३ नुसार १६ नोव्हेंबर २०१६ च्या सुधारित प्रशासकीय योजनेस मान्यता घेण्याचा उल्लेख असून, त्यामुळे धरण उंचीवाढीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माकणी धरणावर आधीच अशी उपसा सिंचन योजना तसेच उजव्या आणि डाव्या कालव्यांद्वारे पाणी आरक्षण करण्यात आले आहे. या धरणावरून निलंगा, उमरगा, लोहारा या शहरांसह अनेक गावांना पाणीपुरवठा होतो. लोकमंगल साखर कारखान्याचे आणि मतारीद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांचे आरक्षणही याच धरणावर आहे. सध्या धरणाची पाणी साठवण क्षमता ८५ दशलक्ष घनमीटरपर्यंत घटली असून, त्यावर बेलकुंड उपसा योजनेचे ११ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण टाकले गेल्याने उंची वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे प्रशासनाचे मत आहे.

मात्र, धरणाची उंची वाढल्यास पूर्वीच आपली ७५ टक्के शेती गमावलेले शेतकरी पुन्हा भूमिहीन होण्याच्या संकटात सापडतील, असा इशारा देत शेतकरी नेते अनिल जगताप यांनी जनआंदोलनाचा ध्वज उचलला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या गावोगाव बैठका घेतल्या जात आहेत.
खेड-नागोर यानंतर कानेगाव येथे झालेल्या शेतकरी बैठकीत आमदार प्रवीण स्वामी म्हणाले,
“अनिल जगताप यांनी शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी आंदोलन उभारले आहे. भूमिहीन होण्याच्या संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा असून, जगताप यांच्या भूमिकेशी माझी भूमिकाही सुसंगत आहे.”
या बैठकीस राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणाताई सलगर, शेतकरी नेते अनिल जगताप, युवा नेते अजिंक्य बापू पाटील, शिवानंद तोडकरी, दत्तात्रय गाडेकर, महेश गोरे, गणेश फत्तेपुरे, महेश लोभे, संजय लोभे, शैलेश चंदनशिवे आदींसह कानेगाव, भातागळी, नागोर, खेड, आरणी या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





