उमरगा : Balsurwadi Road Development :
स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर बलसुर वाडी गावाला पक्का रस्ता मिळण्याचा आशेचा किरण. दोन अभियंत्यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक संपन्न.

उमरगा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या केंद्रबिंदू असणाऱ्या बलसुर गावाजवळील तीन किलोमीटर अंतरावरील बलसुरवाडी हे एक छोटीशी वाडी. पन्नास पेक्षा कमी घर त्यामुळे राजकारणाची कृपादृष्टी वाडीवर नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून77 वर्षे पूर्ण होऊनही गावात जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. पावसाळ्यातील तर गावकऱ्याचे हाल न विचारलेलेच बरे. सर्व बाजूने पाणी गावात येत असल्याने वाडीला तळ्याचे स्वरूप.

शेतकरी संवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी नेते अनिल जगताप बलसुरवाडीमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना गावकऱ्यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनाला आणून दिली. प्रश्नाचं गांभीर्य व गावकऱ्यांच्या व्यथा, भावना लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली वेगाने चक्र फिरली.

दरम्यान अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी तहसीलदार श्री गोविंद येरमे यांची भेट घेऊन परिस्थिती त्यांना समजावून सांगितली त्यांनीही तातडीने प्रश्नाचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद व उपविभागीय अभियंता बांधकाम विभाग यांना पत्र देऊन तातडीने 3 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित केली.

आज योगायोगाने तालुक्याचे लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी सर ,तहसीलदार श्री गोविंद येरमे , जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता श्री बिराजदार साहेब व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री घोडके साहेब, शेतकरी नेते अनिल जगताप बलसुरवाडी येथील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयामध्ये या विषयाच्या संदर्भाने बैठक पार पडली.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे दोन किलोमीटरचा रस्ता तर राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडे तीन किलोमीटर व 200 मीटरचा रस्ता तयार करून देण्याचे ठरले तसेच यामध्ये एक पुलाचे काम करण्याचे ही ठरले. दरम्यान अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या गावाच्या संदर्भाने राज्य शासनाने पायाभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून काही योजना आखल्या आहेत त्यामध्ये गावात वाहून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याचे ठरले.

एखाद्या कार्यकर्त्याने मनावर घेऊन काम केले तर काय घडू शकते हे बल्सुरवाडीच्या उदाहरणावरून समोर आले आहे बनसुरवाडी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी तहसील कार्यालयातील बैठकीतच अनिल जगताप यांचे आभार मानले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून उपेक्षित असलेला रस्त्याचा प्रश्न यामुळे निकाली निघण्याची आशा निर्माण झाली आहे.




