Ativrushti Madat 2025 : लोहारा-उमरगा तालुक्यातील 79880 शेतकरी अजूनही मदतीसाठी प्रतीक्षेत -शेतकरी नेते अनिल जगताप यांचा आंदोलनाचा इशारा !

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Ativrushti Madat 2025 : लोहारा उमरगा तालुक्याला मंजूर असलेली 2024 ची अतिवृष्टीची मदत पाच ऑक्टोबर पर्यंत द्या अन्यथा 6 ऑक्टोबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन धरणे आंदोलन करणार शेतकरी नेते अनिल जगताप यांची ई-मेल निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात धाराशिव कळम परंडा आणि वाशी या चारच तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मंजूर झाले होते. त्यानंतर शेतकरी नेते अनिल जगताप यांनी अतिवृष्टीने लोहारा उमरगा तालुक्यात नुकसान झाल्याचे प्रशासनाला दाखवून दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उमरगा लोहारा तालुक्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला होता मात्र विभागीय आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात प्रस्ताव आला नसल्याचे कारण दाखवत एक वर्षभर लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवले होते.

Ativrushti Madat 2025

30 एप्रिल रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकरी नेते अनिल जगताप यांनी धरणे आंदोलन केल्यानंतर तसेच नारंगवाडी तालुका उमरगा येथे रस्ता रोको चा इशारा दिल्यानंतर अखेर 29 जुलै रोजी राज्य शासनाने शासन निर्णय काढून उमरगा लोहारा तालुक्यातील 79,880 शेतकऱ्यांना 86 कोटी 46 लाख 34 हजार रुपयांचे अतिवृष्टीचे अनुदान मंजूर केले होते. या दोन्ही तालुक्याला अतिवृष्टीचे अनुदान मंजूर होऊन जवळपास दोन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे मात्र अद्यापही अतिवृष्टी अनुदानाची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांना विक्रीत केली गेलेली नाही.

महाराष्ट्र आता थांबणार नाही गतिमान सरकार अशी स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या राज्य शासनाकडून शेतकऱ्याची घोर निराशा झालेली आहे. दुर्दैवाने इथल्या राज्यकर्त्यांनी देखील जेवढ्या ताकतीने या प्रकरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढ्या ताकतीने लक्ष दिलं गेलेलं नाही त्यामुळे मंजूर असलेल्या गेल्या वर्षीच्या अनुदान रकमेसाठी शेतकऱ्यांना धरणे आंदोलन करण्याची वेळ आली आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे.

मंजूर असलेल्या अतिवृष्टी अनुदानातून उमरगा तालुक्यातील ४९६८२ शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाख तर लोहारा तालुक्यातील 30 हजार 532 शेतकऱ्यांना ते तीस कोटी सत्तर लाख रुपये मिळणार आहेत.

या संदर्भात प्रशासनाकडे विचारणा केली तर कधी पोर्टल उशिरा ओपन झाले आहे तर कधी याद्या करण्याचे काम सुरू आहे अशी थातूरमातूर उत्तरे देत आहे. प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वेळ लागेल याबाबत ही अनिश्चितता आहे व त्यात कुठलीही स्पष्टता नाही.

Ativrushti Madat 2025

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात अनिल जगताप यांनी 5 ऑक्टोबर पर्यंत हे अनुदान वितरित नाही झाल्यास 6 ऑक्टोबर रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.