जिल्हा धाराशिव, लोहारा – पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या हजारो खातेदारांचे कोट्यवधी रुपये बँकेत अडकले असून या बँक घोटाळ्याच्या विरोधात आज ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक धरणे आंदोलन केले. शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात ठेवीदारांचा रोष आणि आक्रोश स्पष्ट दिसून आला.
24 ऑगस्टपर्यंत पैसे न दिल्यास 25 ऑगस्टला राष्ट्रीय महामार्ग रोखणार!

अनिल जगताप यांनी आपल्या भाषणात स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली की,
“जर बँकेने ठेवीदारांचे पैसे 24 ऑगस्टपर्यंत परत केले नाहीत, तर 25 ऑगस्ट रोजी आष्टामोड (ता. लोहारा) येथील राष्ट्रीय महामार्ग रोखला जाईल.”
या घोषणेला ठेवीदारांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला असून, टाळ्यांचा गजर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला.
25 कोटींपेक्षा जास्त रक्कम अडकलेली!
पार्वती मल्टीस्टेट बँकेत सुमारे 350 ते 400 ठेवीदारांचे 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे. यामध्ये विधवा, अपंग, महिला, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि अगदी जवानांचाही समावेश आहे.
पोटाला पीळ मारून जमवलेली रक्कम आजही परत न मिळाल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत.
न्यायालयीन लढाईबरोबर रस्त्यावरचा संघर्षही सुरू!
- अनिल जगताप यांच्या नेतृत्वात मुंबईत गृह, सहकार, अर्थ व ईडी विभागांकडे 4 स्वतंत्र याचिका दाखल.
- लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातही 2 याचिका दाखल होणार.
- ठेवीदारांनी सांगितले — “आम्ही अनिल दादांच्या निर्णयावर पूर्ण विश्वास ठेवतो.”
जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर!

आंदोलनानंतर ठेवीदारांनी जिल्हाधिकारी श्री. कीर्ती किरण पूजार यांना निवेदन सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी खातेदारांना आश्वस्त केले की:
“या प्रकरणावर मी बारीक नजर ठेवून आहे. उपनिबंधक यांना सूचित केले आहे. सोमवारपासून संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.”
ठेवीदारांच्या प्रमुख मागण्या!
- बँकेचे संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करा.
- संचालकांची मालमत्ता जप्त करा.
- जबाबदार संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने अटक करा.
महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग!
या धरणे आंदोलनात महिला ठेवीदारांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. त्यांनीही आपल्या व्यथा मांडत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात बँक घोटाळ्याने कसा शोषण केला हेही ठळकपणे समोर आले.
संघर्षाला आता वळण मिळणार?
सहकारी बँकांमधील अपारदर्शक व्यवहार व खातेदारांची फसवणूक ही चिंतेची बाब झाली आहे. पार्वती मल्टीस्टेट बँकेतील ठेवी परत मिळाव्यात, यासाठी ठेवीदारांचा रस्त्यावरचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आला आहे.
25 ऑगस्टला राष्ट्रीय महामार्ग रोखला गेल्यास प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.