(धाराशिव) : Pik Vima Status Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी पिक विम्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली होती. एकूण 7 लाख 19 हजार 267 शेतकऱ्यांनी विमा भरला होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी एचडीएफसी पिक विमा कंपनीने आतापर्यंत 218 कोटी 8 लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित केले आहेत. मात्र काढणी पश्चात कव्हर (Post-Harvest Cover) अंतर्गत अजूनही 75 हजार 677 शेतकऱ्यांना 48 कोटी 94 लाख 47 हजार 251 रुपये थकीत आहेत.
तालुका वाईज थकीत पिक विमा रक्कम
तालुका | थकीत शेतकरी संख्या | थकीत विमा रक्कम (₹ कोटी) |
भूम | 4,460 | 2.46 |
धाराशिव | 11,317 | 8.59 |
कळम | 10,592 | 6.37 |
लोहारा | 9,412 | 6.22 |
परंडा | 2,131 | 1.18 |
तुळजापूर | 13,923 | 10.93 |
उमरगा | 2,091 | 12.63 |
वाशी | 3,751 | 1.10 |
एकूण | 75,677 | 48.94 |
शेतकरी नेते अनिल जगताप यांची प्रतिक्रिया
शेतकरी नेते अनिल जगताप यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले –

“राज्य शासनाने कंपनीकडे देय रक्कम वर्ग केल्याचे अधिकृतरीत्या सांगितले आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी 11 जुलै रोजी राजस्थानमधून थकीत पिक विमा वाटपाचा उल्लेख केला होता. मात्र धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही एक पैसाही मिळालेला नाही. एचडीएफसी पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचा 48 कोटी 94 लाख रुपये बुडवून बसली आहे. जर 28 ऑगस्टपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही, तर 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन उभारले जाईल.”
29 ऑगस्टला धरणे आंदोलनाचा इशारा
धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकरी अजूनही आपल्या हक्काच्या पिक विमा रकमेची वाट पाहत आहेत. सरकारने पिक विमा कंपन्यांवर दबाव आणून थकीत रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा 29 ऑगस्टला होणारे आंदोलन जिल्ह्यात मोठा वळण घेऊ शकते.