लोहारा तालुक्यातील रस्ते तातडीने दुरुस्त करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे अनिल जगताप यांची आग्रही मागणी  | Lohara Taluka Roads

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

लोहारा : Lohara Taluka Roads : लोहारा तालुक्यातील रस्ते तातडीने दुरुस्त करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे अनिल जगताप यांची आग्रही मागणी

लोहारा : लोहारा तालुक्यातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच आवश्यक ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे मंजूर करून ती लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी आग्रही मागणी पिक विमा अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल जगताप यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Lohara Taluka Roads

निवेदनात श्री. जगताप यांनी नमूद केले आहे की, लोहारा–नागूर–कास्ती–भातागळी–अरणी या मार्गावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून, विशेषतः लोहारा शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक धोकादायक बनली असून वाहनचालक, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

तसेच भातागळी मोड ते अरणी मोड या दरम्यान रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असूनही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरील काही गावांतून औसा–लातूर या मार्गावरील प्रवासी बससेवाही बंद करण्यात आली असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

Lohara Taluka Roads

लोहारा हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्यालय असल्याने विविध प्रशासकीय कामांसाठी, शिक्षणासाठी, आरोग्य सेवांसाठी तसेच शेतीसाठी आवश्यक बियाणे व कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक या मार्गाने प्रवास करतात. मात्र रस्त्यांची दुरवस्था असल्यामुळे त्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना व संबंधितांना योग्य त्या सूचना देऊन तातडीने रस्ते दुरुस्त करावेत व नवीन रस्त्याची निर्मिती करावी अशी विनंती देखील जगताप यांनी निवेदनात केली आहे.