पीक विमा व अतिवृष्टी अनुदानासाठी योगदान देणाऱ्या अनिल जगताप यांचा येळी ग्रामस्थांकडून जंगी सत्कार; २५ हजार रुपयांची आर्थिक मदत. Anil Jagtap

Picture of नव महाराष्ट्र

नव महाराष्ट्र

उमरगा : Anil Jagtap : धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी अनुदान तसेच विविध शासकीय मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या कार्याचा गौरव करत उमरगा तालुक्यातील येळी येथील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी त्यांचा जंगी सत्कार केला. यावेळी त्यांच्या सामाजिक कार्याला बळ मिळावे या उद्देशाने गावकऱ्यांनी निधी संकलित करून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली.

Anil

गेल्या पाच वर्षांपासून अनिल जगताप हे केवळ लोहारा व उमरगा तालुक्यातीलच नव्हे, तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पीक विमा, अतिवृष्टी अनुदान, शासकीय मदत तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली असून, आवश्यकतेनुसार उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंतही धाव घेतली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत येळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

Anil Jagtap

यावेळी ग्रामस्थांनी बोलताना, “अनिल जगताप यांनी पुढील काळातही शेतकऱ्यांसाठी असेच निस्वार्थपणे कार्य करत राहावे. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून आम्ही ही मदत करत आहोत. भविष्यात आणखी गरज भासल्यासही गावकऱ्यांच्या वतीने सहकार्य केले जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.

Anil Jagtap

सत्काराला उत्तर देताना अनिल जगताप म्हणाले, “चालू वर्षी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी ५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, १४ मे रोजी नारंगवाडी येथे रास्ता रोको, तसेच वगळलेल्या १४ महसूल मंडळांना न्याय मिळावा यासाठी ३० जुलै रोजी लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आपण कायम संवेदनशील आहोत. वगळलेल्या १४ महसूल मंडळांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, या संदर्भात राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे याचिका दाखल करण्यात आली असून, लवकरच मंत्रालयात बैठक होऊन सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Anil Jagtap

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील सूर्यकांत माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवलिंग आप्पा माळी, मुरूम येथील प्रगतिशील शेतकरी व्यंकटराव मोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पवार, माजी सरपंच साधूराम हिंदोळे तसेच नवनिर्वाचित उपसरपंच प्रमोद कांबळे उपस्थित होते. प्रास्ताविक विनोद कांबळे यांनी केले. कार्यक्रमास शहाजी चालुक्य, राम रेड्डी, सागर बिराजदार, रामलिंग बिराजदार, बाळासाहेब मोरे, किरण पवार, शिवराज बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन गिरीजा आनंद बिराजदार यांनी केले.