छत्रपती संभाजीनगर | Dharashiv Drought 2026 : 23 सप्टेंबर 2026 : मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांनी केलेल्या दुष्काळी पाहणी दौऱ्यानंतर आज, 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांची भेट घेण्यात आली. यावेळी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुद्दा विशेषत्वाने मांडण्यात आला. जिल्ह्यात पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या प्रमुख समस्या मांडल्या

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या विविध प्रश्नांकडे विभागीय आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये पिकांचे नुकसान, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची समस्या, रोजगाराचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न आणि शेतसारा माफी यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे.
तसेच रखडलेल्या पीक विमा भरपाईच्या रकमेचा प्रश्न देखील बैठकीत मांडण्यात आला. विशेषतः खरीप 2025 पीक विमा नुकसान भरपाईतून वगळण्यात आलेल्या 14 महसूल मंडळांचा प्रश्न प्रामुख्याने विभागीय आयुक्तांसमोर मांडण्यात आला.
रोहित पवारांनी दिली तातडीने संभाजीनगरला बोलावण्याची सूचना

आमदार रोहित दादा पवार यांनी आज सकाळीच सूचना देऊन तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे बोलावून घेतले. विभागीय आयुक्तांसमोर धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्याची संधी दिल्याचे अनिल जगताप यांनी सांगितले.
सामान्य कार्यकर्त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल रोहित पवार यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
मागण्यांवर शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन

मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी शासनाकडे तातडीने मागण्यांची शिफारस करण्याबाबत आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, पशुपालक, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी मांडण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित

या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मराठवाड्यातील विविध जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.




