कानेगाव : Election campaign social work : निवडणूक खर्चातून समाजकार्याचा आदर्श : शेतकऱ्यांच्या मदतीतून उभ्या राहिलेल्या निधीतून लोहारा तालुक्यातील सात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार मदत.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, धाब्यावरची जेवणं, विविध आमिषं हे जणू निवडणुकांचं ठरलेलं गणित बनलं आहे. मात्र अशा वातावरणात काटकसर, प्रामाणिकपणा आणि समाजभान यांचा आदर्श उभा करणारे उदाहरण म्हणजे शेतकरी नेते अनिल जगताप.

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी 2020 ते 2024 या कालावधीत अनिल जगताप यांनी सातत्याने संघर्ष केला. पिक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, कांदा अनुदान, प्रोत्साहन अनुदान, दूध अनुदान, पार्वती मल्टीस्टेट बँकेचा प्रश्न, मच्छिमार बांधवांचे प्रश्न अशा विविध विषयांवर त्यांनी शासनदरबारी आवाज उठवला. वेळप्रसंगी आंदोलनं, राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांतून शेतकऱ्यांना शेकडो कोटी रुपयांचा लाभ मिळाल्याचं वास्तव आहे.
कानेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सौ. नीता अनिल जगताप या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघातील घरोघरी जाऊन त्यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा थेट मतदारांपर्यंत पोहोचवला आहे.

आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित असल्याची जाणीव धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असल्याने, त्यांनी स्वतःहून निवडणूक खर्चासाठी थेट आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, केवळ धाराशिवच नव्हे तर अमरावती, बुलढाणा, जळगाव, सांगली, संभाजीनगर, बीड आदी जिल्ह्यांतूनही शेतकऱ्यांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. पाच वर्ष शेतकऱ्यांसाठी केलेल्या प्रामाणिक कामाची ही पावतीच मानली जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा खर्च एक लाख रुपये च्या आत ठेवण्याचा निर्धार अनिल जगताप यांनी केला आहे. जमा झालेल्या रकमेतील उर्वरित निधीतून निवडणूक समताच लोहारा तालुक्यात आत्महत्या केलेल्या सात शेतकरी कुटुंबांना मदत करण्यात येणार आहे. विशेषतः त्यांच्या घरातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरावी, असा त्यांचा आग्रह आहे.

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण चिंताजनक असून मागील काही वर्षांची आकडेवारी हे विदारक वास्तव अधोरेखित करते. अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी जमा झालेल्या पैशातून काटकसरीने खर्च करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.



